Washim Fake Currency | १० लाखांच्या बनावट नोटांसह राजस्थानचा तरुण जेरबंद!

आरोपीचे दोन साथीदार फरार, टोल नाका, पानटपरी येथे नोटा खपवण्याचा प्रयत्‍न
Washim Fake Currency | १० लाखांच्या बनावट नोटांसह राजस्थानचा तरुण जेरबंद
Washim Fake Currency | १० लाखांच्या बनावट नोटांसह राजस्थानचा तरुण जेरबंद
Published on
Updated on

वाशिम : वाशिम-हिंगोली महामार्गावरील तोंडगाव टोल नाक्यावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानमधील एका संशयित आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, यातील दोन साथीदार पसार झाले आहेत. ही कारवाई 5 जून रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

आरोपींनी वाशिम बायपासवरील एका पान टपरीवर ५०० रुपयांची बनावट नोट देऊन साहित्य खरेदी केले होते. ही बाब पान टपरी चालकाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ तोंडगाव टोल नाक्यावर संपर्क साधून माहिती दिली. दरम्यान, हे आरोपी टोल नाक्यावर पोहोचले असता, 'फास्टॅग' बंद असल्याचे सांगत त्यांनी तेथेही ५०० रुपयांची बनावट नोट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या टोल नाक्याचे मॅनेजर रवी गोटे यांनी प्रसंगावधान राखत चालकाला गाडी मागे घेण्यास भाग पाडले आणि आरोपीला रोखून धरत पोलिसांना पाचारण केले.

माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस उपविभागीय अधिकारी पथक आणि वाशिम ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आसीफ अली मोहम्मद मजीद (वय २५, रा. जि. नागौर, राजस्थान) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात असलेली राजस्थान पासिंगची स्कार्पिओ गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. दरम्यान, मुख्य आरोपीसोबत असलेले अन्य दोन साथीदार टोल नाक्यावरून पसार होण्यात यशस्वी झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वाशिम जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांतील ही बनावट नोटांसंदर्भातील दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वीही पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून आरोपीला अटक केली होती. पुन्हा एकदा मोठी कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news