

वाशीम : शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या एकबुर्जी धरणात शुक्रवारी (दि.१९) मृत जनावर आढळून आले. यामुळे या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सद्यस्थितीत एकबुर्जी धरण पूर्णपणे भरले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे दररोज अनेक पर्यटक सांडवा पाहण्यासाठी येत आहेत. असे असताना धरणावर अनुचित घटना न घडण्यासाठी नगरपालिकेने कुठलीही व्यवस्था केलेली नाही. पालिकेचा कुठलाही कर्मचारी या परिसरात दिसून येत नाही. शुक्रवारी सकाळी काही पर्यटक सांडवा पाहण्यासाठी जात असताना प्रकल्पात डोकावल्यानंतर त्यांना काठावर मृत जनावर आढळून आले. याच प्रकल्पातील पाणीसाठा वाशिम शहराला पुरविला जातो. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून त्या पर्यटकांनी मृत जनावराचे फोटो काढून मीडिया आणि सोशल मीडियाकडे पाठविले आहेत.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव एकबुर्जी या धरणात मृत जनावर वाहून आले असून सद्य स्थितीत अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृत जनावर आढळून आले असून त्याची दुर्गंधी सर्वत्र सुटली आहे. या धरणाच्या पाण्याचा वापर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी वापर करीत आहेत. मृत जनावराचा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला आहे.