

वाशिम : यंदा हळदीच्या विक्रमी लागवडीमुळे चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाण्याच्या भीषण टंचाईने पाणी फेरले आहे. रिसोड, मालेगाव आणि वाशिम तालुक्यांत यंदा मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड करण्यात आली. मात्र, पावसाळ्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे धरणे, तलाव, नदी-नाले आणि शेतकऱ्यांच्या बोअरवेल कोरड्या पडल्या. परिणामी, लाखो रुपयांचा खर्च करून जोपासलेले हळदीचे पीक डोळ्यादेखत वाळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
यंदा पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरविल्याने खरीप हंगाम संकटात सापडला होता. मात्र, परतीचा पाऊस तरी समाधानकारक होईल आणि पाण्याची तूट भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. बाजारपेठेत हळदीचे भाव गगनाला भिडत असल्याने चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी हळद पिकासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी हळदीच्या पिकावर जवळपास एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च केला.
मात्र, १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागांतील बोअरवेल, नदी आणि तलाव कोरडे पडल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला. पिकाला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांसमोर हतबल होण्याशिवाय पर्याय उरला नाही. एवढा खर्च करूनही पाण्याअभावी हळदीचे पीक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
करंजी गावात ८०० ते १ हजार एकर हळद वाळली!
या दुष्काळी परिस्थितीची भीषणता करंजी गावातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अवस्थेवरून स्पष्ट होते. एकट्या करंजी गावात जवळपास १२०० ते १५०० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यापैकी तब्बल ८०० ते १००० एकरांवरील हळदीचे पीक पाण्याअभावी सुकून वाळून गेले आहे. शेतकऱ्यांनी केलेला लाखोंचा खर्च, घेतलेले कर्ज आणि उत्पन्नाच्या आशेने पाहिलेली स्वप्ने आता मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा!
हळद हे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने या पिकाची निवड केली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे लागवड, खते, औषधे आणि मजुरीचा खर्च वाढला, तर दुसरीकडे पिकाला जगविण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही.
आता कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत. पाण्याअभावी वाळलेल्या हळद पिकाचे स्वतंत्र सर्वेक्षण करून बाधित शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बाजारात हळदीचे भाव वाढले, पण पिकाला जगविण्यासाठी पाणीच मिळाले नाही. त्यामुळे यंदा हळदीचे भाव गगनाला भिडले असले, तरी हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे.