

Washim First Solar Power Plant
वाशिम : महावितरणच्या ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर’ (SMART) योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील पहिला सौर प्रकल्प चिखली बु. येथे कार्यान्वित झाला आहे. या योजनेचा लाभ घेणारे चिखली बु. येथील रहिवासी राजू पारस्कर हे जिल्ह्यातील पहिले लाभार्थी ठरले आहेत.
पारस्कर यांच्या घराच्या छतावर उभारण्यात आलेल्या १ किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सोलर यंत्रणेचे उद्घाटन महावितरणचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे यांच्या हस्ते दि. १८ रोजी करण्यात आले. या सौर प्रकल्पामुळे पारस्कर यांच्या घरातील वीजखर्चात मोठी बचत होणार असून, त्यांच्या वीज बिलाचा भार जवळपास संपुष्टात येणार आहे.
मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळात ‘स्मार्ट’ योजना राबविण्यात येत आहे. उद्घाटनप्रसंगी कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती तसेच सोलर शक्तीचे उमेश जोशी उपस्थित होते.
अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी असलेल्या राजू पारस्कर यांच्या १ किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेची एकूण किंमत ५० हजार रुपये आहे. त्यापैकी केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये, तर राज्य शासनाकडून १० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. त्यामुळे पारस्कर यांना केवळ ५ हजार रुपयांचा लाभार्थी हिस्सा भरावा लागला.
‘स्मार्ट’ योजनेअंतर्गत १ किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविल्यास घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १०० ते १२० युनिटपर्यंत वीज मोफत मिळण्यास मदत होणार आहे. योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल (BPL) घटकांसाठी २,५०० रुपये, अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) प्रवर्गासाठी ५,००० रुपये, तर सामान्य प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास ग्राहकांसाठी १० हजार रुपये इतका नाममात्र लाभार्थी हिस्सा निश्चित करण्यात आला आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून दिली जात आहे.
दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनी ‘स्मार्ट’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता संदीप दरवडे यांनी केले आहे.