

वाशिम :शहरातील काळे फैल परिसरातील गणेशोत्सवात मूर्तीच्या पायथ्याशी पॉर्न वेबसाईटची टेलिग्राम लिंक असलेला क्यूआर कोड चिकटवणाऱ्या तीन तरुणांची पोलीस कोठडी संपल्याने, न्यायालयाने २१ सप्टेंबर रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
जय भवानी गणेश मंडळाच्या मूर्तीजवळ १७ सप्टेंबरच्या रात्री पॉर्न वेबसाईटची लिंक देणारा क्यूआर कोड लावण्यात आल्याचे उघडकीस आले होते. राम काळबांडे यांच्या तक्रारीवरून वाशिम शहर पोलिसांत भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही आणि बातमीदारांच्या मदतीने तन्मय शंकर मुठाळ (वय १९), युगंधर मोहन अफुने (वय १८) आणि सुमित कैलास भोने (वय १८) या तिघांना अटक केली. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी त्यांना २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
२१ सप्टेंबर रोजी मुदत संपल्याने तिघांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपींनी इतरत्र असे प्रकार केले आहेत का, याचा तपास पोलीस निरीक्षक संजय चौधरी करत आहेत.