

अजय ढवळे
वाशीम : जिल्ह्यात चालत्या बसमधून प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या सराईत महिला टोळीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला टोळी विशेषतः गर्दीच्या बसमध्ये महिलांना टार्गेट करत असे. प्रवासादरम्यान गोंधळ निर्माण करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याच्या साखळ्या व इतर दागिने लंपास केले जात होते. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. संशयितांच्या हालचालींवर पाळत ठेवत अखेर या महिला आरोपींना अटक करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 13/03/2026 रोजी फिर्यादी नामे निर्मला दिलीप श्रीनाथ रा. रिसोड ह्या रिसोड वरुन उमरखेड येथे जात असता त्यांची अनसिंग जवळ चालत्या बस मध्ये पर्स चोरी गेली होती. त्यामध्ये सोन्याची पोथ व नगदी रक्कम असल्याबाबत पोलीस स्टेशन अनसिंग येथे फिर्याद दिल्या वरुन पोलीस स्टेशनला अप क्र 82/2026 कलम 303(2) भा.न्या. सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत स्थानिक गुन्हे शाखा वाशिम च्या टिमने अनसिंग परीसरात शोध घेतला. बस मध्ये चोरी करणाऱ्या काही महिला असल्या बाबत माहिती समोर आली होती.
दिनांक 20/03/2026 रोजी वाशिम येथील बस स्थानक येथे काही महिला ह्या संशयास्पद स्थितीमध्ये उभ्या असुन त्या चोरी करण्याच्या हेतुने आल्या आहेत. अशी गोपनिय माहिती मिळाली. वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी एक टिम तयार करुन वाशिम बस स्थानकावर पाठविली. बस स्थानक परीसराची पाहणी केली असता काही महिला संशयास्पद स्थितीमध्ये उभ्या असल्याबाबत खात्री झाल्याने त्यांना महिला पोलीस अंमलादार यांच्या मदतीने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन अनसिंग येथे नेवुन विचारपुस केली असता दिनांक 13/03/2026 रोजी बस मध्ये एका महिलेची पर्स चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. सदर आरोपी महिलांची नावे 1. लक्ष्मी व्यंकटेश गड्डी वय 35 वर्ष 2. कविता अशोक गड्डी वय 30 वर्ष 3. गंगम्मा उलगया गड्डी वय 50 वर्ष सर्व रा चिखलठाणा जि. संभाजीनगर असे आहेत.
सदर महिलांकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन पुढील तपास अनसिंग पोलीस स्टेशन करीत आहे. सदर महिला कडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनि योगेश धोत्रे पोउपनि शेखर मास्कर व टिमने अथक परीश्रम घेतले आहे.