

वाशिम : बस प्रवासादरम्यान महिलांच्या गर्दीचा फायदा घेत सहप्रवासी महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या सात महिलांना मानोरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २ लाख ७८ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, सुखेखा हनुमान इंगोले (वय ४५, रा. मोहगव्हाण पारवा, ता. मानोरा) यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्या आपल्या माहेरी बोरी, ता. दिग्रस, जि. यवतमाळ येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. भोयणी फाटा येथे बसमध्ये चढल्यानंतर त्या आपल्या लहान मुलांसह बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या जवळ व आजूबाजूच्या सीटवर ६ ते ७ अनोळखी महिला बसल्या होत्या.
दरम्यान, सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास मानोरा बसस्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी जवळील मोठ्या पर्समधील लहान पर्स तपासली असता त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये सोन्याची अंगठी, कानातील सोन्याचे दागिने, सोन्याची शिपला डोरला मणीसह, सोन्याची पोत, पेंडॉल, मणी तसेच चांदीचे पायातील जोडवे असा एकूण २१ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम सोन्याचा व २० ग्रॅम चांदीचा ऐवज चोरीस गेला होता. या दागिन्यांची एकूण अंदाजे किंमत २ लाख ७८ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
तक्रार प्राप्त होताच मानोरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस पथकाने मानोरा ते दिग्रस मार्गावरील विठोली परिसरात शोधमोहीम राबविली. तक्रारदार महिलेने दिलेल्या वर्णनावरून संशयित महिलांची ओळख पटवून सात महिलांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत अलबेली मुन्ना छट्टू (वय २३), शंकर अम्मा व्यंकटेश छट्टू (वय ३३), गीता राजू छट्टू (वय २१), कविता विष्णा छट्टू (वय २०), गिताई राजू छट्टू (वय २६), लक्ष्मी शिवा छट्टू (वय ३५) आणि सुप्रिया धर्मा छट्टू (वय २०, सर्व रा. चिखलठाण, जि. संभाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फुंड मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नयना पोहेकर व त्यांच्या पथकाने केली. या पथकात हेड कॉन्स्टेबल शेषराव राठोड, पोलीस कर्मचारी चेतन भोयर, रोहन तायडे, फिरोज शेख, शंकर राठ, महिला पोलीस अंमलदार सुषमा लोखंडे व शितल कराळे यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नयना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रामबाबू सरोदे, आशिष एकाडे व गोकुळ पांडुळे करीत आहेत.