Washim news: प्री-वेडिंगनंतर तब्येत खालावली; नववधूचा मृत्यू, दोन्ही कुटुंबांवर शोककळा

ठरलेल्या लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधीच नववधूचे निधन झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला
Washim news: प्री-वेडिंगनंतर तब्येत खालावली; नववधूचा मृत्यू, दोन्ही कुटुंबांवर शोककळा
Pudhari
Published on
Updated on

वाशीम : जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणीच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. ठरलेल्या लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधीच नववधूचे निधन झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, घरातील आनंद क्षणात विरून गेला आहे.

सदर तरुणीचा विवाह डोणगावजवळील एका तरुणासोबत निश्चित झाला होता. ३ मे २०२६ रोजी विवाह सोहळा पार पडणार होता. या निमित्ताने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. दागिने, कपडे तसेच इतर खरेदी उत्साहात पार पडली होती. आयुष्यातील या खास क्षणांना जतन करण्यासाठी तरुणीने आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत प्री-वेडिंग फोटोशूटही केले होते. कृषी संकल्पनेवर आधारित हे फोटोशूट निसर्गरम्य परिसरात पार पडले होते. नव्या आयुष्याची रंगीत स्वप्ने डोळ्यांत साठवून ती भविष्याची स्वप्ने विणत होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

१६ एप्रिल २०२६ रोजी तिची प्रकृती अचानक खालावली. सुरुवातीला स्थानिक स्तरावर उपचार करण्यात आले; मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला शिरपूर, वाशीम, अकोला आणि शेवटी संभाजीनगर येथे हलवण्यात आले. कुटुंबीय प्रत्येक ठिकाणी आशेचा किरण धरून होते. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, तरीही २३ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. वाढलेल्या उष्णतेचा तडाखा किंवा अतिताण यामुळे प्रकृती खालावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही तरुणी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा महासागर कोसळला आहे.

विशेषतः आई-वडिलांची अवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे. काही दिवसांपूर्वी लेकीच्या लग्नाची स्वप्ने पाहणारे तेच आई-वडील आज तिच्या आठवणीत व्याकूळ झाले आहेत. “हातात मेहंदी पाहायची होती, पण नियतीने हातातूनच लेकरू हिरावून नेले,” अशी हळहळ व्यक्त करत त्यांनी आक्रोश व्यक्त केला. घरात जिथे लग्नाच्या तयारीचा गजबजाट होता, तिथे आता शोककळा पसरली आहे. लेकीच्या जाण्याने आई-वडिलांच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असून, हा आघात त्यांना आयुष्यभर विसरता येणार नाही. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news