वाशिम : ३३ रिसोड, ३४ वाशिम,आणि ३५ कारंजा या विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पोलीस बंदोबस्तात होणाऱ्या मतमोजणीतून ३ विधानसभेच्या ६२ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल असणार आहे.
: ३३-रिसोड विधानसभा मतदारसंघ येथील मतमोजणी तहसील कार्यालय, ३४-वाशिम विधानसभा मतदारसंघ येथील मतमोजणी कोरोनेशन क्लब हॉल , ३५-कारंजा विधानसभा मतदारसंघ येथील मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर येथे होणार आहे.
विधानसभेच्या मतमोजणीस त्या-त्या ठिकाणी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून मतदारांच्या संख्येनुसार फे-या होणार आहेत. यात ३३ रिसोड २५ फेऱ्या, ३४ वाशिम २८ फेऱ्या व ३५ कारंजा २६ फेऱ्या होणार आहे. या मतमोजणीत टपाली मतदानाची ईव्हीएम व ईटीपीबीएस च्या मतांची मोजणी होईल.
मतमोजणीसाठी तीनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक कोतवाल, मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिली. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत ६७.०९% मतदानाची नोंद झाली. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी उत्साहाने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
जिल्ह्यातील एकूण १०,०९,१०७ मतदारांपैकी ६,७६,९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३,५५,४४१ पुरुष, ३,२१,५१४ महिला आणि १३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.