वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

महिलांनी भररस्त्यात चूल पेटवून सरकारचा केला निषेध; गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचा आरोप
वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
Published on
Updated on

वाशिम : राज्यात निर्माण झालेली गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या उडालेल्या पोरंबळीच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य 'जन आंदोलन' करण्यात आले. "नरेंद्र, कब मिलेगा गॅस सिलेंडर?" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनादरम्यान महिला पदाधिकाऱ्यांनी थेट रस्त्यावर चूल पेटवून भाकरी आणि ठेचा बनवला व तो जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करून अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला.

गॅस टंचाईमुळे जीव गमवावे लागल्याची टीका

यावेळी बोलताना नेत्यांनी अकोला येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाठ आणि अमरावती येथील तरुणाच्या मृत्यूचा दाखला दिला. तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने अनेकांचे प्राण जात आहेत, तर दुसरीकडे स्वयंपाकघरातील शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि हॉटेल्स गॅसअभावी बंद पडत असल्याने हातावर पोट असलेल्या हजारो व्यावसायिकांच्या पोटावर लाथ मारली जात असल्याची टीका आंदोलकांनी केली.

बाळासाहेब आंबेडकरांचा इशारा खरा ठरला!

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी ११ मार्च रोजीच गॅस आणि पेट्रोकेमिकल्सच्या टंचाईबाबत इशारा दिला होता. सरकारचा नियोजनशून्य कारभार आणि संकटकाळातील तयारीचा अभाव यामुळेच आज लग्न समारंभ, केटरिंग व्यवसाय आणि रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या

प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत: १. गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ थांबवून काळाबाजार रोखावा. २. '२५ दिवसांनंतरच गॅस मिळेल' ही अट शिथिल करण्यात यावी. ३. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने 'कम्युनिटी किचन' सुरू करावे. ४. KYC नसल्याचे कारण सांगून गॅस नाकारू नये, नागरिकांना तातडीने पुरवठा करावा. ५. जिल्ह्यातील उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांचे पारदर्शक ऑडिट करावे. ६. परिस्थिती कधी सामान्य होईल, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे.

नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव रंगनाथ धांडे, सोनाजी इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योतिताई इंगळे, प्रतिभाताई अंभोरे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, मिलिंदताई बनसोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. "मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र लढा उभारला जाईल," असा इशारा यावेळी देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news