

वाशिम : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे हे दि.२७ जून रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कर्जमुक्ती व नुकत्याच ६ खासदारांनी घेतलेल्या भुमिके बाबत आपले मत मांडत आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या सभेला विशेष महत्व राहणार आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यांने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील सहा खासदारांनी उबाठाला सोडचिठ्ठी देऊन दुसरा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असून सदर खासदाराविरुद्ध तीव्र आंदोलन करावे असे सुचित करण्यात आल्याने कार्यकर्ते चांगलेच भडकले होते. अशा वातावरणात उद्धव ठाकरे हे २७ जून रोजी दुपारी तीन वाजता वाशीम येथे येणार असून जिल्ह्यातील शेतकरी व सेना पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. जिल्ह्यातील तापलेले राजकीय वातावरण लक्षात घेता उद्धव ठाकरे यांच्यादौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.