

वाशिम : वाशीमजवळ असलेल्या तोंडगाव टोल नाक्यावर सुविधा उपलब्ध होत नसल्याने मनसेच्यावतीने टोल नाका फोडण्यात आला होता. अखेर या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गजानन वैरागळे आणि उमेश टोलमारे असे या अटक आरोपीचे नावे आहेत.
वाशीमच्या तोंडगाव फाट्यावरील टोल नाक्यावर वाहनधारकांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध केले जात नव्हते. मनसेकडून वारंवार मागणी करूनही याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत होते. त्यामुळे दि. 8 जुलै रोजी आक्रमक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड करत 4 लाखांचे नुकसान केले होते. या प्रकरणातील दोन जणांवर वाशीम ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते. अखेर काल त्या दोन्ही आरोपींना अकोला येथून अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील कारवाई करीता दोन्ही आरोपींना वाशीम ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सूरु आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी आणि त्यांच्या पथकाने केली.