

वाशीम : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचार आणि महिला अत्याचाराच्या आरोपांनी वादग्रस्त ठरलेले संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्याने वाशिममधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आज पाटणी चौकात शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून जोरदार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
वाशिममधील शिवसैनिकांनी खासदार भावना गवळी यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची जोरदार मागणी केली. महिला अत्याचार व भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री करू नये, अशी कार्यकर्त्यांची ठाम भूमिका आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिले, मात्र, शिवसेनेत एकाही महिलेला संधी न दिल्याचा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अशा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन शिवसेनेचे नेमके काय उद्दिष्ट आहे? असा प्रश्न शिवसैनिकांनी यावेळी केला आहे. वाशिम शहरातील पाटणी चौकातील आंदोलनाची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे.