पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी (दि.५) शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. त्यांनी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM kisan 18th Installment) योजनेचा १८ वा हप्ता आज जारी केला. पीएम मोदी यांनी वाशीम येथील कार्यक्रमात बटन दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता ९.४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला. या हप्त्यासाठी केंद्र सरकारने एकूण २० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. याआधी १८ जून २०२४ रोजी या योजनेचा १७ वा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला होता. (PM Modi Washim Visit)
पीएम मोदी आज वाशीम दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पोहरादेवीचे दर्शन घेत पूजा केली. तसेच त्यांनी आज येथील सभेला संबोधित केले. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना २०१८ मध्ये पहिल्यांदा सुरु करण्यात आली होती. देशभरातील छोटे आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना आर्थिक साहाय्य देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. या योजनेतर्गंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक ६ हजार रुपये जमा केले जातात. याआधी १७ वा हप्ता १८ जून २०२४ रोजी जमा करण्यात आला होता.
अधिकृत PM-KISAN वेबसाइटला भेट द्यावी.
लाभार्थी यादी पेजवर जावे.
राज्य, जिल्हा, उपजिल्हा, विभाग आणि गाव कोणते? ही माहिती नोंदवा.
लाभार्थी नावाची यादी शोधण्यासाठी 'Get Report' निवडा.
पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर खाली दिलेल्या पर्यायांद्वारे ई-केवायसी करून घ्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये सुमारे २३,३०० कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.