

Washim maternal death case district hospital controversy
वाशिम: एका नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घटना ताजी असतानाच, वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. श्वेता पडघान (वय २४) नावाच्या तरुण महिलेचा प्रसूतीदरम्यान उपचारावेळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच श्वेताचा जीव गेल्याचा गंभीर आरोप करत, जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका तिच्या संतप्त नातेवाईकांनी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता पडघान यांना प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांचा घटनाक्रम आणि त्यानंतर ओढवलेल्या संकटामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेतावर झालेली शस्त्रक्रिया आणि त्यानंतर तिच्या प्रकृतीत झालेली घसरण खालीलप्रमाणे आहे. मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजताच्या सुमारास श्वेताची सिझेरियन शस्त्रक्रिया झाली. काही तासांनंतर तिच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून तिची गर्भपिशवी काढली. मात्र, यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, उलट ती अधिकच खालावत गेली. रात्री साडेआठ वाजता तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु तिथे उपचारादरम्यान रात्री ९ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर योग्य उपचार केले नाहीत, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच श्वेताचा बळी गेला, असा थेट आरोप कुटुंबीयांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच याच रुग्णालयात नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी झालेल्या गदारोळानंतर आरोग्य सेवेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. आता या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, रुग्णालयाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे जिल्हा स्त्री रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक आपल्या भूमिकेवर ठाम असून, रुग्णालय प्रशासनावर प्रचंड दबाव वाढला आहे. आता प्रशासन या प्रकरणी काय पाऊल उचलते आणि पडघान कुटुंबीयांना न्याय मिळतो का?, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.