

गेल्या १५ ते २० वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर आणि अहोरात्र सेवा देऊनही शासन दरबारी उपेक्षित राहिलेल्या '१०२ रुग्णवाहिका' चालकांनी आता आरपारच्या लढाईचे हत्यार उपसले आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय रुग्णवाहिका चालक कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २३ फेब्रुवारी २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात 'चक्काजाम' आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकही मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रुग्णवाहिका चालकांनी दिलेल्या निवेदनानुसार, २००५ पासून हे चालक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रुग्णांची सेवा करत आहेत. ऊन, वारा, पाऊस किंवा कोरोनासारखे भीषण संकट असो, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता या चालकांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. मात्र, आकृतिबंध आराखड्यामध्ये चालक हे पद मान्य असूनही अनेक वर्षे त्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका चालकांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. २३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका चालक आपापल्या वाहनांच्या चाव्या जमा करून मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच करणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून विनाखंड सेवा देणाऱ्या चालकांना जिल्हा परिषदेअंतर्गत विनाअट सामावून घ्यावे. कंत्राटी किंवा आऊटसोर्सिंग पद्धत बंद करून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी. अल्प मानधनाऐवजी शासनाच्या नियमानुसार वेतनश्रेणी लागू करावी.
या आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका सेवा बंद राहिल्यामुळे रुग्णांचे जे काही हाल होतील किंवा कोणताही अनर्थ घडल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हाजिमियां नसीरअहमद शेख यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा आरोग्य विभाग आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.