

वाशिम : आजच्या नवयुवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत शिक्षण, राष्ट्रविकास आणि समाजसेवेत पुढे यावे. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि शिस्त यांचे पालन करून समाजासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे. शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपले कार्य अधिक प्रभावी करण्याचा संकल्प केला पाहिजे. शिवरायांचा आदर्श घेऊन शिक्षण व राष्ट्रविकासासाठी कार्य करूया, असे प्रतिपादन आ. किरणराव सरनाईक यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित कार्यक्रमात अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरणराव सरनाईक अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, उपजिल्हाधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल कावरखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत तसेच शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. आ.किरणराव सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जय शिवाजी जय भारत पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मार्गस्थ होऊन बाकलीवाल विद्यालय, रिसोड नाका, पाटणी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी समारोप झाला.
यावेळी आ. किरणराव सरनाईक यांनी शिवरायांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि समाजासाठी सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन केले. आयोजकांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती सांगत, समाजात एकता आणि राष्ट्रप्रेमाचे बळ वाढावे, हा या पदयात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री . घुगे यांनी प्रास्ताविकातून पदयात्रेची माहिती देत शिवरायांचे शौर्य, प्रशासनकौशल्य आणि दूरदृष्टी यांचे महत्त्व पटवून देत, आजच्या तरुणांनी त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन केले. त्यांनी शिवरायांचा आदर्श घेऊन समाजात एकता, शिस्त आणि राष्ट्रसेवेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला.