सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करूया : पालकमंत्री हसन मुश्रीफ

पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Let's develop the district with everyone's cooperation: Guardian Minister Hasan Mushrif
सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करूया : पालकमंत्री हसन मुश्रीफFile Photo
Published on
Updated on

वाशिम : पुढारी वृत्तसेवा

आपला जिल्हा निती आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. ही ओळख पुसण्यासाठी आपण प्रयत्न करु. वाशिम जिल्ह्याचा प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनू शकतो. आपल्या संविधानाच्या आदर्शांवर चालत, आपण विकासाची नवी शिखरे गाठूया. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी केले.

आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व अपर पोलीस अधिक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्यासह इतर मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मुश्रीफ म्हणाले, आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडीची संख्या दीड पट वाढली असून, गरोदर माता आणि बालकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. टीबी मुक्त भारत मोहिमेंतर्गत २४ हजार ७०० रुग्ण तपासण्यात आले असून, ६८५ रुग्णांवर यशस्वी उपचार सुरू आहेत. याशिवाय वाशिम येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. ज्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. आरोग्य सेवेत जिल्हा रूग्णालय मागील ४ महिन्यांपासून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

वाशिम जिल्ह्याने शेती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. सन २४-२५ या हंगामासाठी १ लक्ष ३८ हजार १५ शेतकऱ्यांना १ हजार ६०० कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, दोन्ही हंगामांमध्ये एकूण १ लक्ष २४ हजार ६६० शेतकऱ्यांना १ हजार २२७ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हा प्रयत्न महत्त्वाचा ठरला आहे.

पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, कृषी रब्बी हंगामामध्ये कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळून देणारे चियासीड पिक रब्बी-२०२४ मध्ये ९५० हेक्टर वर पेरणी झाली होती त्यामधून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळाल्याचे दिसून आले. चालू रब्बी हंगाम २०२५ मध्ये ३५०० हेक्टर क्षेत्रावर चियासीड ची पेरणी झालेली आहे आणि, रब्बी साठी उत्तम पिकाचा पर्याय निर्माण झालेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात एकुण ३ लक्ष ८ हजार ४०६ शेतकऱ्यांना रूपये १८४ कोटी पेक्षा जास्त विमा नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. राज्यात खरीप हंगाम २०२३ पासून सर्वसमावेशक प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करुन १ रुपयात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होता आले. त्यामुळे खरीप २०२४ मध्ये वाशिम जिल्हयातील १ लक्ष ९६ हजार ५०४ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला असुन ३ लक्ष ५२ हजार ५३५ हेक्टर क्षेत्र नुकसानी पासून संरक्षित झाले आहे.

पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले. वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक, होमगार्ड पुरुष व महिला दल, बाकलीवाल विद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे पथक, सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेचे विद्यार्थी, नवोदय विद्यालयाचे स्काऊट पथक, सुरकंडी येथील मुलींचे निवासी शाळेचे पथक, महात्मा गांधी नगर परिषद शाळेचे पथक, पोलीस बँण्ड पथक, शिघ्र कृती दल, पोलीस श्वान पथक, पोलीस बॉम्ब शोधक पथक, पोलीस मोबाईल फॉरेन्सीक इनव्हेस्टीगेशन व्हॅन, पोलीस वॉटर कॅनॉन, शासकीय रुग्णालयाची अत्याधुनिक रुग्णवाहिका व नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे वाहन आदी परेडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विविध पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वीर पत्नी शांताबाई यशवंत सरकटे व पार्वतीबाई दगडू लहाने, वीरमाता मंदाताई गोरे, वीरपीता तानाजी गोरे व वीर पत्नी वैशाली गोरे, वीरपत्नी मीराबाई नागुलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाचे प्रा. मोहन शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, नागरिक व विविध शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यानंतर, विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news