

वाशिम : जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सोमवार १७ फेब्रुवारी रोजी श्री. अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर शिरपूर जैनला (ता.मालेगाव) भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भगवान पार्श्वनाथाच्या मुर्तीचे दर्शन घेतले आणि मंदिराची संपूर्ण पाहणी केली.
गांधी यांनी यावेळी मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वावर बोलताना सांगितले की, शिरपूर येथील श्री. अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर हजारो वर्ष जुने आहे. मागील काही वर्षांपासून जैन समाजातील दिगंबर व श्वेतांबर समुदायांमध्ये काही वाद सुरू झाले आहेत. या वादांमुळे मंदिराच्या विकासावर आणि पावित्र्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे गांधी यांनी दोन्ही पंथीयांना एकत्र येऊन वाद मिटवण्याचे आवाहन केले. तसेच मंदिराची दुरुस्ती आणि त्याच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान, दिगंबर व श्वेतांबर पंथीयांचे मान्यवर तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. गांधी यांनी मंदिर भेटीनंतर दिगंबरी समुदायाचे संत श्री. सिद्धांतसागर महाराज यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर त्यांनी श्वेतांबर समुदायाचे संत पंन्यास प्रवर श्री. विमलहंस विजयजी महाराज व मुनीश्री श्रमणहंस विजयजी महाराज यांची भेट व आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली.
याप्रसंगी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे मॅनेजिंग ट्रस्टी दिलीप शाह, प्रा.डी. ए. पाटील कोल्हापुर, फूलचंद जैन संभाजी नगर, ऋषिकेश कोंडेकर, शोभा कोंडेकर नांदेड, रत्नाकर महाजन, विकी गोरे, कांतीलाल बरडीया, प्रकाशचंद सोनी, अनिश शाह, किशोर सोनी, पारसमल गोलेछा, मनीष संचेती, सुगनचंद देवडा, शितल खाबिया, भिवराज श्रीमाल, जंबुकुमार बाफना, शिखरचंद बागरेचा, रितेश शेठ, सौरभ जैन आदींच्यासह विश्वस्त मंडळ उपस्थित होते. गांधी यांच्या भेटीनंतर त्यांचे शिरपूरहून वाशिमकडे प्रस्थान झाले.