

वाशीम : अजय ढवळे
वाशिमच्या राजुरा गावात रात्रीच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर आजी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
राजुरा येथील सुनीता बोंढारे (४५ वर्षीय) महिला आपल्या आठ वर्षीय नातू चरण बोंढारेसह रात्री घरात असताना घरात सिलिंडरचा स्फोट होऊन अचानक आगीचा भडका उडाला.
आजी आणि नातू आगीच्या विळख्यात सापडल्यानं दोघेही भाजून गंभीर जखमी झाले. आरडाओरड सुरू झाल्यानं शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांच्याही अंगावर पाणी टाकून आग विझविली.
दोघांनाही उपचारासाठी वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र ८ वर्षीय चरण बोंढारे या मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर आजीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल होते.