Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करा; मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आवाहन

संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाचे प्रयत्न; जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यावर भर
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करा; मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आवाहन
Published on: 
Updated on: 

वाशीम : राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असून, या संकटाच्या काळात त्यांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. या मदतकार्याला अधिक व्यापक स्वरूप देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांनी दिवाळीतील एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालवून त्यांच्यासोबत सण साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार संजय भेंडे, परिणय फुके, कृष्णा खोपडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांना आवश्यक असलेले सहकार्य आणि मदत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. केवळ शासकीय पातळीवरच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांकडून सुरू असलेल्या मदतकार्याला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. मात्र, संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. अशा वेळी शेतकरी कुटुंबांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेणे आणि त्यांना आपण एकटे नसल्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. याच भावनेतून प्रत्येक मंत्र्याने दिवाळीतील एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आपण केले आहे, असे फडणवीस म्हणाले.

या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्र्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांशी संवाद साधावा, त्यांच्या परिस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना मानसिक आधार देणे आणि त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. शेतीशी संबंधित संकटांचा परिणाम केवळ शेतकरी कुटुंबांपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास मदतकार्य अधिक व्यापक होऊ शकते. याच उद्देशाने मंत्र्यांनी दिवाळीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालवावा. आपणही नागपूर जिल्ह्यातील एका गावात एक दिवस जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगत, दुष्काळावर सर्वांनी मिळून मात करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. दरम्यान, माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्रित केलेला मदतीचा धनादेश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.