Buldhana Illegal Sex Determination | बुलढाण्यातील शेतातील गोठ्यात गर्भलिंग तपासणी, वाशिमचा एजंट, बोगस डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा

अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश; तीन जिल्ह्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई, पोर्टेबल मशीन जप्त
Buldhana Sex Determination Racket
Buldhana Sex Determination Racket Pudhari
Published on: 
Updated on: 

Buldhana Sex Determination Racket

वाशिम : वाशिम येथील एजंटच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदानाच्या प्रकाराचा वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी पथकाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर-लवाळा रोडवरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी सुरू असताना पथकाने छापा टाकून बोगस डॉक्टर, वाशिम येथील एजंट आणि त्याला मदत करणाऱ्या अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेतले. घटनास्थळावरून सोनोग्राफी मशीनसह तपासणीचे साहित्य जप्त करण्यात आले असून, तिघांविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम येथील एजंटच्या माध्यमातून संबंधित बोगस डॉक्टर विविध ठिकाणी जाऊन पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने अवैध गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डिकॉय केस तयार करून कारवाईचे नियोजन करण्यात आले. अकोला मंडळाच्या उपसंचालक डॉ. आरती कुलवाल, वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे आणि बुलढाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही जिल्ह्यांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबविली.

Buldhana Sex Determination Racket
Buldhana Earthquake | बुलढाण्यात भूकंपाचे सौम्य धक्के; मलकापूर, संग्रामपूर, नांदुरा हादरले!

२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून संशयितांच्या हालचालींवर पथक लक्ष ठेवून होते. पाठलाग करताना संशयित अमडापूर-लवाळा रोडवरील गणेश शंकरराव सूर्यवंशी यांच्या शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोहोचले. डिकॉय केसच्या माध्यमातून सोनोग्राफी तपासणी सुरू होताच दुपारी २ वाजता पथकाने छापा टाकला. कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, सोनोग्राफी मशीन आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी चिखली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमर सय्यद यांनी सायंकाळी ६ वाजता अमडापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कारवाईत वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांतील पीसीपीएनडीटी विभागाचे वैद्यकीय अधिकारी, विधी समुपदेशक आणि आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आणि अमडापूर पोलिसांनीही मोहिमेला सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.