

अजय ढवळे
वाशीम : जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावातील तरुणीच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. ठरलेल्या लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधीच नव वधूचे निधन झाल्याने कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला असून, घरातील आनंद क्षणात विरून गेला आहे.
सदर तरुणीचा विवाह डोणगावजवळील एका तरुणासोबत निश्चित झाला होता. ३ मे २०२६ रोजी विवाह सोहळा पार पडणार होता. या निमित्ताने कुटुंबात आनंद, उत्साह आणि नव्या आयुष्याची स्वप्ने फुलली होती. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. दागिने, कपडे तसेच इतर आवश्यक खरेदीही मोठ्या उत्साहात करण्यात आली होती.
आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणांना जतन करण्यासाठी तरुणीने आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत प्री-वेडिंग फोटोशूट केले होते. कृषी संकल्पनेवर आधारित हे शूट निसर्गरम्य परिसरात पार पडले होते. नव्या संसाराची रंगीत स्वप्ने डोळ्यांत साठवून ही तरुणी आनंदाच्या भरात भविष्याची स्वप्ने विणत होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. १६ एप्रिल २०२६ रोजी तिची प्रकृती अचानक बिघडली. सुरुवातीला स्थानिक स्तरावर उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती अधिक गंभीर होत गेल्याने तिला शिरपूर, वाशिम, अकोला आणि शेवटी संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी कुटुंबीय आशेचा धागा पकडून उभे होते. डॉक्टरांच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही २३ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. सध्या वाढलेल्या उन्हाचा तडाखा किंवा अतिताण यामुळे प्रकृती खालावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही तरुणी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा महासागर कोसळला आहे. विशेषतः आई वडिलांची अवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे. काही दिवसांपूर्वी लेकीच्या लग्नाची स्वप्ने डोळ्यांत साठवणारे तेच आई-वडील आज तिच्या आठवणीत अश्रृंनी व्याकुळ झाले आहेत.
'हातात मेहंदी पाहायची होती, पण नियतीने हातातूनच लेकरूच हिरावून नेले,' अशी हळहळ व्यक्त करत आई-वडील आक्रोश करत आहेत. लेकीच्या लग्नासाठी जपून ठेवलेले स्वप्न, केलेली तयारी आणि उभा केलेला आनंदाचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला आहे. घरात जिथे लग्नाच्या तयारीचा गजबजाट होता, तिथे आता शोककळा पसरली आहे. लेकीच्या जाण्याने आई-वडिलांच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असून, हा आघात त्यांना आयुष्यभर विसरता येणार नाही. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू दाटले आहेत.