Banjara Samaj | बंजारा समाजाच्या कायम पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य उद्घाटन,   पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार -  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महोत्‍सवामध्ये सामजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिमत्‍वांचा सत्‍कार करण्यात आला.
महोत्‍सवामध्ये सामजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिमत्‍वांचा सत्‍कार करण्यात आला.
Published on
Updated on

वाशिम : संत सेवालाल महाराज यांनी समाजाला स्वाभिमान, सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रेरणादायी आहेत. पोहरादेवी हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे.

पर्यटन विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसतो, तर तो स्थानिक संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करणारा असतो. पोहरादेवी परिसराचा नियोजनबद्ध विकास करताना श्रद्धेचा सन्मान राखून सुविधा अधिक सक्षम करण्यात येईल. बंजारा समाजाच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दृरदृश्यप्रणालीव्दारे संदेश देतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संत सेवालाल महाराज यांचे विचार समाजात समता, बंधुता आणि सेवाभाव रुजवणारे आहेत. पोहरादेवी हे केवळ धार्मिक स्थळ नसून, पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी क्षमता असलेले केंद्र आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आवश्यक त्या पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व पर्यटक सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.संत सेवालाल महाराज यांचा वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पोहरादेवीसारख्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला, तर स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शासन विकास आणि सामाजिक समरसतेसाठी कटिबद्ध आहे.पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार धर्मगुरू बाबुसिंग महाराज, आमदार किरण सरनाईक, आ.सई डाहाके, आ.राजेश राठोड , आ.किसन वानखडे, पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनी नाईक,  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी पर्यटन महोत्सवाची रूपरेषा विषद केली.

समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. संत सेवालाल महाराज यांच्या विचारांवर समाज चालत आहे. जयंती शासन स्तरावर साजरी करण्यात येते. विकासकामांची माहिती दिली. शासनाचे भक्कम पाठबळ पोहरादेवी विकासासाठी मिळत आहे. बंजारा काशीची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने श्री संत सेवालाल महाराज यांचे नाव दिल्याबाबत शासनाचे आभार व्यक्त केले.  महंत जितेंद्र महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले, संत सेवालाल महाराज यांनी शांतीचा संदेश दिला. बंजारा समाजाचा विकास करावा. 

राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवामुळे पोहरादेवीचा नावलौकिक वाढत आहे. अशा उपक्रमांतून युवा पिढीला संस्कृतीची ओळख होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ या भागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील. पोहरादेवीला जोडणारी विकास कामांची माहिती दिली. पर्यटन राज्यमंत्री म्हणून पोहरादेवी विकासासाठी हातभार लावला जाईल. 

सेवारत्न पुरस्कारांचे वितरण

महोत्सवाच्या निमित्ताने समाजसेवा, सांस्कृतिक कार्य आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ७ मान्यवरांना सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

  या भव्य आयोजनामुळे पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव राज्यपातळीवर विशेष लक्षवेधी ठरला असून, भविष्यात या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या महोत्सवामुळे श्रद्धा, संस्कृती आणि पर्यटन विकास यांचा प्रभावी संगम घडून येत असल्याचे चित्र दिसून आले.  कार्यक्रमाला विविध मान्यवर महंत, विश्वस्त, ट्रस्टी, नागरिक उपस्थित होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news