

वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दर्शनासाठी आयोजन करण्यात आले आहे. तसेच या पवित्र अस्थींचे विसर्जन मालेगाव तालुक्यातील प्रसिद्ध चाका तीर्थ येथील काटेपूर्णा नदीच्या तीरावर करण्यात येणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता झाशी राणी चौक कारंजा, सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मानोरा नंतर मंगरुळपीर येथे मुक्काम होणार.
३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मंगरुळपीर येथील बिरबल नाथ मंदिर चौक येथे सकाळी ९ वाजता, सकाळी ११ वाजता वाशिम येथील पाटणी चौक आणि दुपारी १ वाजता रिसोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तर दुपारी ३ वाजता मालेगाव येथील जुने बस स्थानक येथे अस्थी दर्शनासाठी दाखल होतील. त्यानंतर दुपारी ४ वाजता श्री क्षेत्र डव्हा येथील चाका तीर्थ येथे अस्थी विसर्जन कार्यक्रम संपन्न होईल. तरी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे.