

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ग्राम अंजनखेडा येथील अवैधरित्या गावठी दारु विक्री करणारा सराईत गुन्हेगारावर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार (दि. ५ मार्च) रोजी एमपीडीए (मोका) कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. अजाबराव दत्ता पायघन असे या आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील सर्व प्रकारचे अवैध धंदे करणार्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध हातभट्टी दारु, गाळप, वाहतुक, विक्री करणार्याविरुध्द प्रभावी रेड करुन अवैध दारुचे व्यवसाय नष्ट करण्याचे व दारुबंदी मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने अवैध हातभट्टी दारुवाल्यांविरुध्द प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरीता सर्व ठाणेदार यांना आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार
अजाबराव दत्ता पायघन, (वय ४५ वर्ष रा. अंजनखेडा ता. जि. वाशिम) हा अंजनखेडा येथे गावठी हातभटटीची दारु तयार करुन परिसरात अवैधरित्या विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या अवैधरित्या विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये दिलेल्या आदेशानुसार (अधिनियम १९८१ (सुधारणा १९९६,२००९ व २०१५) चे कलम ३(१) अन्वये कार्यवाही करुन स्थानबध्द-एमपीडीए) अजाबराव पायघन याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
सदर स्थानबध्दतेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, पोलीस निरिक्षक प्रतिबंधक सेल प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर पो.स्टे.वाशिम ग्रामीण, पोलीस उप निरीक्षक शब्बीर खान पठाण, पोहेकॉ विनोद सुर्वे, दिपक सोनोने, प्रशांत राजगुरु, अमोल इंगोले, पो. शि. विजय नागरे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.