माझी मान कापली तरी मी एक इंचही मागे हटणार नाही, ओबीसीतूनच मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटील | पुढारी

माझी मान कापली तरी मी एक इंचही मागे हटणार नाही, ओबीसीतूनच मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटील

मोडनिंब; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ओबीसीतून २७% आरक्षणात घ्या ही मागणी मान्य होईपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, माझी मान कापली तरी मी एक इंचही मागे हटणार नाही मला जेलमध्ये टाकले तरी मी आंदोलनच करणार असा ठाम विश्वास मनोज जरांगे- पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे संवाद मेळाव्यात बोलताना मराठा समाजाला दिला.

माझे स्वप्न आणि माझे ध्येय गोरगरिबांना आरक्षण मिळालेच पाहिजे असं आहे. यासाठी मी मराठा समाजाच्या पाठबळावर लढतो आहे, मराठा समाज हाच माझा मायबाप, हाच माझा मालक असून कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मॅनेज होणार नाही, मी माय बापाशी गद्दारी करणार नाही असा विश्वास यावेळी जरांगे- पाटील यांनी दिला.

मोहोळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शेटफळ येथे जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासंदर्भात संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

सध्या माझ्यावर सरकार दडपशाही दहशत अवलंबत आहे आतापर्यंत तुम्ही मला मोठ्या संख्येने साथ दिली आहे यानंतर सुद्धा मी हाक दिल्यानंतर करोडेच्या संख्येने सात द्या असे भावनिक आवाहान त्यांनी उपस्थित मराठा समाजाला केले. यावेळी समाजाने मोठा पाठिंबा दर्शवला.

मराठा आरक्षणाच्या मागे मोठे षडयंत्र होते मराठ्यांनी एकत्र येऊ नये त्यांची मुलं शिकू नयेत यासाठी षड्यंत्र रचले गेले होते ते आतापर्यंत कायम यशस्वी होत गेले.

मराठ्यांनी फटक्यात दोन काम केली आहेत एक म्हणजे मराठा एकत्र आणून समोरच्यांची तोंडे बंद केली आहेत आणि मराठ्यांचे आरक्षण हे ओबीसीतच आहे हे आता आम्हाला समजले आहे असे ते म्हणाले. एकदा मराठ्यांना आरक्षण मिळाले आणि त्यांची मुले व्यसनापासून दूर राहिली की कोणीही प्रगती रोखू शकणार नाही यासाठी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी सहा महिने झाले आंतरवाली येथे लढा सुरू आहे. महाराष्ट्रातला मराठा करोडोच्या संख्येने यासाठी लढा देतोय तरी देखील सरकार न्याय देत नाही अशी खंत व्यक्त करून अजून पुढील काळात लढा तीव्र करावा लागतोय असे वाटत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. मला शरीराने साथ दिल्यास मी अजून लढा तीव्र करणार असल्याची त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

सरकारने लावलेल्या एसआयटीच्या चौकशी संदर्भात त्यांनी यावेळी आवर्जून खुलासा केला ते म्हणाले सरकारला चौकशी करावी माझ्याकडे खूप वेळ आहे, माझ्याकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती वाहने नाहीत, त्यांनी कशीही चौकशी करावी मी त्यासाठी तयार आहे. त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनात त्यांनी गृहमंत्री सध्या आत्याच्या भूमिकेत असल्याचे उदाहरणासहित उपस्थितांना सांगितले यावेळी मोठा हशा पिकला.

जरांगे पाटील यांनी शेटफळ येथे येतात श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. व्यासपीठाकडे आल्यानंतर त्यांना सुवासिनीने ओवाळले. शेटफळ ग्रामस्थांच्या वतीने सुनील खडके, अनिल वागज, सौदागर भांगे, रमेश भांगे, सुखानंद भांगे यांनी स्वागत केले. याचवेळी जावेद तांबोळी, हिरालाल तांबोळी, करीम आत्तार यांच्यासह पाच मुस्लिम बांधवांनी जरांगे पाटील यांचा सत्कार केला. मोडनिंब च्या वतीने शिव आरोग्य सेनेचे दीपक सुर्वे यांच्यासह मान्यवरांनी विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले.

Back to top button