

वाशीम : रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथील एका २३ वर्षीय तरुण युवकाने राहत्या गावालगत असलेल्या गोठ्यात गळफास लावून आपले जीवन संपवले. विजय गजानन कष्टे (वय २३) असे या मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय हा गुरुवारी (दि.२६) रात्री घरी परतला नव्हता. त्यामुळे काळजीत पडलेली त्याची आई सकाळी त्याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडली. शोध घेत असताना गावालगत असलेल्या गोठ्यासमोर विजयची दुचाकी उभी असलेली त्यांना दिसली. आईने गोठ्यात जाऊन पाहिले असता, विजयने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. आपल्या पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहून आईने हंबरडा फोडला.
घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून विजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. विजयने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
विजय हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे छत्र आधीच हरपलेले असून दोन्ही बहिणींची लग्ने झालेली आहेत. आईसाठी विजय हाच जीवनाचा एकमेव आधार होता. मात्र, त्याने अचानक जीवन संपवल्यामुळे आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मोठेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.