

वर्धा : विधानसभा निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याची सोमवार ४ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांसोबत अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत कोण अर्ज मागे घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या उतरू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. छाननीत त्यापैकी १३ अर्ज बाद झालेत. सोमवारी ४ नोव्हेंबर ही अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख आहे. अंतिम क्षणापर्यंत कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार, याबाबत उत्सूकता असणार आहे. नामनिर्देशनपत्र छाननीत १३ अर्ज अपात्र ठरले होते. त्यात आर्वी १, देवळी ४, हिंगणघाट ४ व वर्धा येथे ४ अर्ज अपात्र ठरले होते.
छाननीनंतर वर्धेत २१, देवळी १५, आर्वी २२ तर हिंगणघाटमध्ये १४ असे ७२ उमेदवारांचे अर्ज राहिलेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ज्यांना निवडणूक लढण्याची इच्छा नाही, ते उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. यावेळी विधानसभा निवडणुकीत लढती अटीतटीच्या ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थिती किती उमेदवार रिंगणात हे बाबही महत्त्वाची आहे. अनेक जणांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. कुणी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे कोण अर्ज मागे घेणार आणि कोण रिंगणात राहणार, याबाबत सर्वांना उत्सूकता लागलेली आहे.
वर्धा आणि हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला बंडखोरीने ग्रासले आहे. महाविकास आघाडीशी संबंध येणार्या उमेदवारांनी अपक्ष नामांकन दाखल केले आहे. वर्ध्यात सुधीर पांगुळ यांनी अपक्ष नामांकन दाखल केले आहे. त्यासोबतच डॉ. सचिन पावडे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समीर देशमुख यांनीही वर्धा विधानसभा मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे.(Maharashtra assembly poll)
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अॅड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विठ्ठल गुळघाणे यांनीही अपक्ष अर्ज सादर केलेला आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बंडखोरी थांबणार की उमेदवारी कायम राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.