

वर्धा : वर्दळीच्या ठिकाणी बसस्थानक परिसरात सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन महिलांना शनिवारी (दि.२२) पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
वर्धा बसस्थानक, देवळी बसस्थानक, शहरातील बाजारपेठ तसेच वर्दळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने, नगदी रूपये वारंवार चोरी होत असल्याच्या घटना घडत असल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू होता. यादरम्यान एका बसस्थानकाजवळ दोन महिला संशयितरित्या आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. यावेळी या दोन्ही महिलांनी देवळी बसस्थानक, वर्धा बसस्थानक तसेच वर्धा शहर परिसरात महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या -चांदीचे दागिने व रूपये असा ४ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वर्धा शहर व देवळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या महिलांचे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, प्रभारी पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, राहुल ईटेकर, सचिन इंगोले, हमीद शेख, शेखर डोंगरे, राजेश तिवस्कर, विकास मुंढे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राउत, निलीमा उमक, पल्लवी बोबडे यांनी केली.