

वर्धा : पेट्रोलपंपावर थांबलेल्या ट्रॅव्हल्समधून महिलेच्या बॅगमधून अज्ञात चोरट्याने ३ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी (दि.२१) समृद्धी महामार्ग विरुळ शिवारातील पेट्रोलपंपावर घडली.
पुण्याहून (एमएच १२ व्हीटी ६३६२) क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूरकडे जात होती. दरम्यान, समृध्दी महामार्ग विरुळ टोलनाक्याजवळील पेट्रोल पंप परिसरात ट्रॅव्हल्स थांबली. या ट्रॅव्हल्समध्ये पुण्याहून जयश्री सतीश वडसकर आपल्या कुंटुंबातील सदस्यांबरोबर नागपूरला जात होत्या. विरुळजवळ पेट्रोलपंप येथे ट्रॅव्हल्स थांबली असता प्रवासी चहापाणी करण्यास उतरले. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश केला. जयश्री वडसकर यांच्या आईवडिलाच्या सीटवर असलेल्या बॅगमधील ३ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास केला. आरडओरड होताच अज्ञात व्यक्तीने पळ काढला. यावेळी ट्रॅव्हल्सच्या बाजूला असलेल्या कारमधून व्यक्ती पसार झाला. याप्रकरणी तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पुलगाव करीत आहेत.