

वर्धा : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमानुसार (RTE) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून (१७ फेब्रुवारी) जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी नामांकित शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
इच्छुक पालकांना ऑनलाईन पद्धतीने १० मार्च २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जात घराचे अचूक ठिकाण निश्चित करण्यासाठी यंदा 'गुगल मॅप'चा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. रहिवासी क्षेत्रापासून एक किलोमीटर अंतरावरील शाळांची निवड पालकांना करता येईल. शेवटच्या क्षणी होणारी तांत्रिक गर्दी आणि सर्व्हरचा अडथळा टाळण्यासाठी पालकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शिक्षण विभागाने कडक पावले उचलली आहेत. एकाच बालकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास, लॉटरी प्रक्रियेसाठी अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे पालकांनी अर्ज भरताना अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक माहिती भरणे अनिवार्य आहे. चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचे आढळल्यास, कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करण्याचा अधिकार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी राखून ठेवला आहे.
वर्धा जिल्ह्यातील एकूण ११३ शाळांमधील १,३७६ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
वर्धा : ४२ शाळा : ४९६ उपलब्ध जागा (नर्सरीसह)
हिंगणघाट : १८ शाळा : २१९ उपलब्ध जागा
देवळी : १३ शाळा : १७१ उपलब्ध जागा
सेलू : १२ शाळा : १६१ उपलब्ध जागा
आर्वी : १२ शाळा : ११८ उपलब्ध जागा
कारंजा : ६ शाळा : ८२ उपलब्ध जागा
समुद्रपूर : ६ शाळा : ८२ उपलब्ध जागा
आष्टी : ४ शाळा : ५७ उपलब्ध जागा
प्रवेशासाठी बालकाचा जन्मदाखला, पालकांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेला दाखला असणे बंधनकारक आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे.