

वर्धा : जिल्ह्यात वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी कठोर करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या तब्बल १६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण चिंताजनक असून, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून २३ आणि २४ मे रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली.
या विशेष मोहिमेदरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एकूण १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सेवाग्राम पोलीस ठाणे हद्दीत ३, अल्लीपूर ३, आर्वी १, कारंजा २, पुलगाव ३ आणि वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्या पथकाने ४ अशा प्रकरणांचा समावेश आहे.
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम आता दररोज राबवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावावा, अती वेग टाळावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी केले आहे.