

वर्धा : जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शनिवारी १८ जुलै रोजी मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले. यावेळी विविध संघटनांच्या वतीने वर्धा बंदची हाक देण्यात आली होती.
वर्ध्यातील एका गावात अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. घटनेचा निषेध व्यक्त ’आम्ही वर्धेकर’ अंतर्गत मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून मोर्चाची सुरूवात झाली. प्रमुख मार्गांनी या मोर्चाने मार्गक्रमण केले. मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिष्टमंडळाच्या वतीने अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये जोरदार घोषणा देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. घटनेच्या निषेधार्थ वर्धा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास व्यापार्यांनी पाठींबा देत दुकाने बंद ठेवली.
या गुन्ह्यात मुख्य आरोपीशिवाय आणखी काहींचा सहभाग होता काय, याची सखोल चौकशी करून आरोपींना तत्काळ अटक करावी, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून विनाविलंब न्याय मिळवून द्यावा, शासनाने तातडीने वरिष्ठ सरकारी वकिलांची नेमणूक करावी, आरोपीला कोणत्याही तांत्रिक मुद्यांवर सूट मिळू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने तपास पूर्ण करून चौकशी अहवाल तातडीने न्यायालयात सादर करावा, शासनाने पीडित कुटुंबाचे त्वरित पुनर्वसन करावे आणि त्यांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्या आदी मागण्यांचे निवेदन अधिकार्यांना सादर करण्यात आले. मोर्चादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.