

वर्धा: जिल्ह्याला जोरदार पावसाने जबर तडाखा दिला. पावसाने अनेक भागात नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नऊ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद नसली तरीही नदी, नाल्यांना पूर आल्याने लगतच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे भिंत पडून एकाचा मृत्यू झाला. ऑटोतील दोन जण सुदैवाने वाहून जाताना बचावले.
गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. रात्रीदेखील पाऊस झाला. पावसामुळे नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. नदी, नाल्यांच्या काठावरील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पिके पाण्याखाली आल्याने अनेक ठिकाणी पिकांवर गाळ साचला होता. नाल्याच्या काठावरील शेतांची परिस्थिती तर बिकट होती. कपाशी, सोयाबीन तसेच इतरही पिकांचे पावसाने अतोनात नुकसान झाले. पावसामुळे जनजीवनदेखील प्रभावीत झाले.
जिल्ह्यात मागील २४ तासांत ६६.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. देवळी मंडळात ७२.३, विजयगोपाल १०३.५, विरुळ मंडळात ९१.८, वर्धा मंडळात ७३.३, वायफड ७०.५, सालोड ८९, वायगाव ७६.५ तर सेवाग्राम मंडळात ७३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
मुसळधार पावसामुळे दहेगाव (स्टेशन) गावातील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे गावातील बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते. यावेळी बोदड येथील काही प्रवासी वायफड येथून दवाखाना आटोपल्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास बोदड येथे जात होते. दरम्यान, ऑटो चालकाने ऑटो बोगद्यातून टाकला आणि ऑटो वाहत जाऊ लागला. त्यावेळी ऑटोसोबत पाच प्रवासी होते. तीन प्रवासी ऑटोमधून उतरून गावात परत आले. दरम्यान दोन जण वाहत गेले असल्याचे पोलिस पाटील संजय खोब्रागडे यांना सांगितले. पोलीस पाटील संजय पाटील यांनी कॉल करून गौरव गावडे यांना माहिती दिली. त्यांनी लगेच पुराजवळ गेले असता ऑटोचालक पाण्यातून बाहेर आले. दरम्यान, एक प्रवासी प्रभाकर पंचभाई बोदड पुरामध्ये अडकले. गौरव गावंडे यांनी पुरात जाऊन त्यांना बाहेर काढले. ऑटोतील सर्व जण सुखरुप बाहेर पडले.
अतिवृष्टीमुळे नाचणगाव येथील बडे प्लॉट परिसरात घर कोसळून ३२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. किरण भुजाडे (वय ३२) असे नाव सांगण्यात आले. संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना संततधार पावसाने टिनाचे छप्पर, सिलिंग फॅन व छतावरील दगड अचानक कोसळले. त्यात किरण भुजाडे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पुलगाव नाचणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. आमदार राजेश बकाने यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
जोरदार पावसामुळे यशोदा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे अल्लीपूर अलमडोह मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अलमडोह येथे गावातील बस थांब्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. सरूळ शिवारात यशोदा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. हिंगणघाट शहरालादेखील पावसाचा जबर तडाखा बसला. येथे ३० ते ४० घरांत पावसाचे पाणी गेले होते. अनेक भागात शेतीचे नुकसान झाले.