

वर्धा : शेतात काम करून घरी परत येत असताना अचानक अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी सहाच्या दरम्यान ब्राह्मणवाडा शिवारात घडली.माधवराव विठ्ठलराव चारोडे (वय ७०, रा. ब्राह्मणवाडा तालुका कारंजा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधवराव चारोडे यांनी शेतात गव्हाच्या पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे ते जागली करण्याकरीता गेले होते. जागलीवरून घरी परत येत असताना गावालगत दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. अस्वालाच्या हल्ल्यात चारोडे यांचा उजवा हात गंभीरित्या जखमी झाला. अस्वलाच्या हल्ल्यातून कशीबसी सुटका करून घेत ते घरी परतले. घटनास्थळी क्षेत्र सहाय्यक निलेश मुन, क्षेत्र सहाय्यक प्रवीण डेहनकर, वनरक्षक योगेश अडसड यांनी भेट दिली. चारोडे यांना उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.