

वर्धा : वर्ध्यात बनावट नोटा छपाईचा भंडाफोड करत पोलिसांनी ५०० रुपयांच्या १४४ नोटा जप्त केल्या. याप्रकरणी वर्ध्यात एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
वर्ध्यातील केजाजी चौक पसिरात एका घरी राहणारे भाडेकरु बनावट चलनी नोटा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने घेराबंदी करून छापा टाकला. तेथे एक विधीसंघर्षीत बालक मिळून आला.
तपासणीत ५०० रुपयांच्या १४४ नकली बनावटी नोटा, प्रींटर, लाकडी फ्रेम, काचेची फ्रेम, इंक बॉटल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी ईश्वर लालसींग यादव हा साथीदार धनराज धोटे, राहूल आंबटकर व विधी संघर्षीत बालक यांच्यासोबत मिळून नकली नोटा तयार करण्याचे काम करीत होता. गावो-गावी आठवडी बाजारात साथीदारांना पाठवून नकली नोटा चलनात आणत होता. ईश्वर यादवचे दोन साथीदार धनराज धोटे व राहूल आंबटकर यांना मालेगाव नाशिक येथे नकली नोटा चलनात आणण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.
ईश्वर यादव हा त्याचे साथीदार पकडले गेले असल्याबाबत चाहूल लागताच घटनास्थळाहुन पसार झाला. त्याच्या शोधाकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहे. याबाबत वर्धा शहर पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी माहिती दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, शहर ठाणेदार संतोष ताले उपस्थित होते.