

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई-ऑफिस प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. 2024-25 च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले. मुंबई येथे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-ऑफिस प्रणालीला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा पुरस्कार स्विकारला.
नवीन तंत्रज्ञानामुळे प्रशासनाच्या कामात नवनवीन बदल करणे आवश्यक ठरते. वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सन 2023-24 मध्ये यशस्वीरित्या राबविली. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता आली. या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान 2023-24 स्पर्धेत वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी व आताचे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्य कर्तृत्वाला द्वितीय पारितोषिक मिळाले. विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या तालुकास्तरावर देखील त्यांनी ई -ऑफिस प्रणाली सुरू केली होती. त्यामुळे फायलींचा पसारा कमी करण्यात मदत झाली. नांदेडमध्येही त्यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे.