

Deoli Cotton Fire
वर्धा : देवळी तालुक्यातील सोनेगाव (आ.) येथील शेतकरी निखिल वानखेडे यांच्या गोठ्यातील खोलीमध्ये साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागली. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सोनेगाव (आ.) येथील शेतकरी निखिल वानखेडे यांच्या गोठ्यातील खोलीमध्ये कापूस ठेवला होता. अचानक लागलेल्या आगीत कापूस मोठ्या प्रमाणात जळला. ही माहिती मिळताच नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता देवळी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला तातडीने घटनास्थळी रवाना होण्याबाबत कळविले.
युवा संघर्ष मोर्चाच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ते स्वतः तात्कळ घटनास्थळी पोहोचले. नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी केवळ प्रशासनाला सूचना देण्यापुरती भूमिका न ठेवता प्रत्यक्ष मदतकार्यात सहभाग घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मदतकार्यात देवळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांनी एकजुटीने शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन विभागाचे रणजीत दाभेकर, आसिफ शेख आणि अक्षय क्षीरसागर यांच्या अथक परिश्रमांसह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या प्रसंगी देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे यांनीही मदतकार्य केले. या मदतकार्यात सोनेगाव (आ.) येथील अखिलेश गावंडे, समीर कुडमते, सचिन पेंदाम, किरण ठाकरे, हितेश भोयर, गंगाधर राऊत, शाम कोहळे, किशोर राऊत, अरविंद अलोने, निखिल जाधव, शंकर पांडे, निखिल जुगनाके यांच्यासह देवळी येथील युवा संघर्ष मोर्चाचे गौरव खोपाळ, प्रविण खाडे, मंगेश वानखेडे आणि भारत फटिंग यांनी सहकार्य केले.