Wardha Crime : वर्धा पोलिसांची १०६ ठिकाणी 'वॉशआऊट' मोहीम; २ कोटी ३६ लाखांची दारू जप्त

Wardha Crime : वर्धा पोलिसांची १०६ ठिकाणी 'वॉशआऊट' मोहीम; २ कोटी ३६ लाखांची दारू जप्त
Pudhari
Published on: 
Updated on: 

वर्धा : जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या मुळावर घाला घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने सोमवारी मध्यरात्रीपासून 'वॉशआऊट' मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १०६ गुन्हे दाखल केले असून, २ कोटी ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या थेट नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार आणि स्थानिक गुन्हे शाखेसह एकूण २९६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली होती. २ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास या सर्व पथकांनी गावठी दारूभट्ट्यांच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली.

कारवाईचा धडाका : १०९ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू गाळली जात असल्याची आणि साठवून ठेवली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पाळत ठेवून हा 'वॉशआऊट' प्लॅन आखला. या कारवाईत एकूण १०६ गुन्हे दाखल करण्यात आले. तर १०९ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच २ कोटी ३६ लाख रुपयांचा दारूसाठा, रसायने आणि दारू गाळण्याचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.

दारू माफियांना कडक इशारा

अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी 'वॉशआऊट' मोहीम मानली जात आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अवैध दारू तयार करणारे आणि पुरवठा करणाऱ्यांच्या साखळीचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news