

वर्धा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रीत कार उलटून बॅरिकेट्सला धडकली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर एका बालकासह एक जण असे दोन जण गंभीर जखमी झालेत. रविवारी (दि. २३) फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात समृद्धी महामार्गावर झाडगाव शिवारात घडला.
प्रयागराजहून बेंगलोरच्या कुंडलो येथील नरेश व्यंकटेश हे के.ए. ५१ एमएक्स ८७६१ क्रमांकाच्या वाहनाने समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जात होते. दरम्यान, मुंबई कॅरिडोरने जात असता समोरील वाहनास ओव्हरटेक करत असताना चालकाला झोपेची डुलकी आली. त्यात वाहन उलटून बॅरिकेट्सला धडकले आणि अपघात घडला. यामध्ये कारचालक सुरक्षित असून मागील बाजूस बसलेल्या चालकाची पत्नी व बहिण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मुलगा आणि नरेश व्यंकटेश यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली. जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
अपघातात रामयाश्री नरेश नायडू (वय ३२) रा. बेंगलोर, शकुंतला रामकृष्णय्या (वय ४५) रा. बेंगलोर यांचा मृत्यू झाला. संजय नांजया (वय ४०) आणि पूर्विक नरेश (वय ०६) हे दोघे जखमी झालेत. याप्रकरणी सेवाग्राम पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्राचे दिलीप थाटे, किशोर येळणे, अशोक भोगे, गजानन देवकते यांनी पंचनामा करत मदतकार्य केले. समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिका तसेच कर्मचार्यांनी यावेळी मदत कार्य केले.