

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : आर्वी येथील अजय कदम यांच्या मालकीच्या जागेवर जबरदस्तीने ताबा घेतल्या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर ठाणेदार यांना तडकाफडकी मुख्यालय ठिकाणी बदली केली आहे. (Wardha Police News)
पोलिस ठाण्यात तक्रार घेवून येणाऱ्याची तक्रार घेणे हे पोलिसांचे कर्तव्य असून त्यानंतर तपास करुन गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे. पण, स्टेशन डायरीवरील कर्मचारी गजानन मरस्कोल्हे व अंमलदार सतिश नंदागवळी यांनी ठाणेदार यांच्या आदेशाशिवाय तक्रार घेतली जाणार नाही, असे अजय कदम यांना सांगून बराच वेळ ठाण्यात बसवून ठेवले. यात स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यानंतर तक्रार दाखल करुन घेण्यात आली. (Wardha Police News)
इतकेच नाही तर हे प्रकरण थेट पोलिस महानिरीक्षकांपर्यंत पोहोचल्याने पोलिस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे आर्वीत दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर ठाणेदार यांची मुख्यालयी बदली करण्यात आली. तर मरस्कोल्हे व नंदागवळी या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.