

Wardha Alodi Rasta Roko
वर्धा : गोपुरी चौक ते साटोडा चौक या मुख्य रस्त्याचे काम मागील अडीच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे आवागमन करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अपघातातही वाढ झाली आहे. धुळीचा त्रास वाढलेला आहे. रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांची जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आलोडी येथील पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये साटोडा, आलोडी, महाकाळ, नालवाडी परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.
गोपुरी चौक ते साटोडा चौक या रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याचे दिसले. मोठ्या वाहनांमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डे, अडथळे व धुळीमुळे आवागमन करणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. सदर रस्त्यावर एक जीवितहानी आणि अनेक लहान मोठे अपघात झाल्याचा आरोप होत आहे. या परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहे.
यासंदर्भात संबंधित प्रशासनास तसेच लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदन देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी आलोडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आलोडी, नालवाडी, महाकाळ, साटोडा येथील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. आंदोलनावेळी माजी सरपंच अजय जानवे, गौरव गावंडे, गणेश ढवळे, संदीप मारवाडी, दीपक भुते, विनोद सायरे, नरेश होनाडे, विपीन कठाणे, राहुल ढोक, पंकज वालदे, बाळा माउस्कर, संदीप मडावी, महेश अणकर आदींची उपस्थिती होती.