वर्धाः जिल्ह्याच्या काही भागांमध्ये शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकाटासह सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यादरम्यान काही भागांमध्ये तुरळक गारपीटदेखील झाली. याचा कपाशी, सोयाबीन, तूर, केळी, पपई आदी पिकांना जबर फटका बसला.
सध्या अनेक शेतकर्यांकडे कापणी केलेले सोयाबीनचे ढीग शेतातच आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास काही भागात जोरदार विजाच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. काही भागात जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. देवळी तालुक्याच्या भिडी शिवारामध्ये तर तुरळक गारपीट देखील झाली. जोरदार वादळ पाऊस आणि गारांमुळे या भागामध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले. पपईची तसेच केळीच्या बाग उध्वस्त झाल्या. अनेक शेतातील कपाशीची झाडेही जमीनदोस्त झाली. झाडावरील कापूस देखील भिजला. शेतात सावंगणी करून ठेवलेले सोयाबीनचे ढीग पावसामुळे भिजले. केळी तसेच पपईच्या बागांची परिस्थिती तर अतिशय बिकट झाली. केळी आणि पपईची झाडे उन्मळून पडली. पपईची काही झाडे मधेच तुटली. या नुकसानीने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.