

वर्धा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार योजनेचा लाभ वर्धाविविध प्रकारच्या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेली आणि 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत व दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न केलेल्या पिककर्जाच्या व्याजासह 2 लाखापर्यंतच्या रक्कमा कर्जमुक्त केल्या जाणार आहे. याच कालावधीतील अल्पमुदती कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतरण केले असल्यास अशा थकीत 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जांना देखील योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेच्या एकवेळ समझोता अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे, अशा शेतकऱ्यांनी दोन लाखावरील रक्कम परतफेड केल्यास त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. दोन लाखावरील शेतकऱ्यांच्या हिश्याची रक्कम भरण्यास 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. वरील रक्कम तातडीने भरण्याची आवश्यकता नसल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काही शेतकरी दरवर्षी अल्पमुदती कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. सन 2022-23, सन 2023-24 व सन 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पिककर्जाची उचल करून 30 जूनपूर्वी किंवा बॅंकेच्या प्रचलित नियमानुसार विहीत वेळेत परतफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन लाभासाठी पात्र आहेत.
कर्जमुक्ती, एकवेळ समझोता व प्रोत्साहन लाभासाठी वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात आला आहे. ही योजना राष्ट्रीयकृत, खाजगी बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांसह प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वत:च्या निधीतून वितरीत केलेल्या कर्जांना लागू आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बॅंकांच्यावतीने पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्याचे काम अंतीम टप्प्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर होऊन त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.