leopard attack on calves
वर्धा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या सहा वासरांचा मृत्यू झाला. या घटनेत एक वासरू गंभीर जखमी झाले. आर्वी तालुक्यातील मोरांगणा (खरांगणा) शिवारात बोथली नटाळा मार्गावर ही घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला.
आर्वी तालुक्यातील खरांगणा वनपरिक्षेत्राअंतर्गत मोरांगणा (खरांगणा) शिवारात बोथली - नटाळा मार्गावर मोरांगणा येथील विजय भड यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात वासरे बांधून होती. २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास विजय भड शेतात गेले असता त्यांना वासरे मृतावस्थेत दिसली. बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील सहा वासरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. खरांगणा (मोरांगणा) येथील क्षेत्र सहायक ए.एम. डेहनकर, मोरांगणा बिटरक्षक अश्विन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पशुवैद्यकीय अधिकारी राजेंद्र घुमडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या घटनेत भड यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भड यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. एक वासरू गंभीर जखमी असल्याची माहिती सांगण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.