पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात चौघांचा मृत्यू
वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर - वर्धा मार्गावर कारच्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नी, मुलगा, मुलगी यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर रानडुक्कर आडवा आल्याने हा भीषण अपघात झाला. ही घटना तरोडा शिवारात सोमवारी (दि. ७) रात्रीच्या सुमारास घडली. (Wardha Accident News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील प्रशांत वैद्य पोलिस दलात कार्यरत होते. सोमवारी रात्री मांडगाव येथून ते परिवारासह कारने वर्ध्याला जात होते. दरम्यान, रस्त्यावर अचानक रानडुक्कर कारच्या आडवा आल्याने रानडुकरास धडकून कार अनियंत्रित झाली. नियंत्रण सुटल्याने कार समोरून येणाऱ्या टँकरला धडकली. या अपघातात प्रशांत वैद्य आणि त्यांची पत्नी व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात पत्नी प्रियंका आणि मुलगा प्रियांश यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. तर प्रशांत वैद्य आणि मुलगी माही यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

