

वर्धा - सत्तेत येत असताना दिलेली आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे. सत्तेत आल्यावर कर्जमाफी देऊ हे महायुतीच्या घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. आता मात्र त्याचा विसर त्यांना पडला आहे. मते मागत असताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी करावी. शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, अशी मागणी आंदोलनातून केली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
त्यांनी सेवाग्राम येथे भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, शेतमालाला जो भाव आहे, अडाणी, अंबानी यांच चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले. कापसाला भाव नाही आहे. धानला भाव नाही. कांदा उत्पादकांच्या समस्या वाढत आहे. बेरोजगारीचा मुद्दा आहे. सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकर्यांच्या शेतमालाला भाव नाही. संपूर्ण कर्जमाफी शेतकर्यांना मिळाली पाहिजे, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. सेवाग्राम येथील शिबिराला भेट देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ सेवाग्राम येथे आले होते.
यावेळी सिसिआयच्या संदर्भात प्रामुख्याने दोन मोठ्या अडचणी आहेत. सीसीआय शेतकर्यांचा शेतमाल घेत नाही आणि व्यापार्यांचा शेतमाल घेत असल्याची ओरड आहे. व्यापाऱ्यांचा माल घेतला की गोडाऊनची सबब पुढे करतात. एवढे मोठे गोडाऊन बांधले आहेत, ते अदानी, अंबानींचे गोदाम ताब्यात घ्यावे, एक्वायर करावे. सरकारने शेवटचे बोंड असेपर्यंत कापूस खरेदी करावा. शेतकर्यांच्या समस्यांत केंद्र आणि राज्य सरकारला स्वारस्य नाही, अशी टीका केली.
विरोधी पक्ष नेत्याबाबत, महाविकास आघाडीमध्ये कुठलीही रस्सीखेच नाही. आम्ही सोबत निवडणूक लढलो आहे. विधी मंडळातील नेते आपसात चर्चा करून तोडगा काढतील. आपसात चर्चा करून निर्णय घेतील, असे सांगितले.