

वर्धा : आर्वी येथील नेहरू मार्केट परिसरातील पाच दुकानांना भीषण आग लागली. ही घटना १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहेत. जवळपास दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्वी येथील नेहरू मार्केट परिसरात १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास काही व्यावसायिक दुकान उघडण्याकरिता गेले. त्यावेळी दुकानातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी परिसरातील व्यावसायिकांना माहिती देत त्यांना बोलावून साहित्य काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु दुकानाच्या आतील बाजूस आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याने धावपळ सुरू झाली.
दुकानांना आग लागल्याची माहिती नगरपरिषद अग्निशमन दलाला देण्यात आली. आर्वी येथील अग्निशमन दलाच्या दोन्ही वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात करण्यात आली. येथे आष्टी व पुलगाव येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने जवळपास दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत चार ते पाच दुकानातील साहित्य जळाले. साहित्य जळाल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. यावेळी आर्वीचे ठाणेदार सतीश डेहनकर, नगरपरिषद मुख्य अधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दल, तसेच स्थानिकांनी सहकार्य केले.