

Narsingpur Farmer Killed By Tiger
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नरसिंगपूर शिवारात शेतात गेलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आष्टी शहरातील कवठीपुरा येथील शेतकरी रामभाऊ भोयर (वय ७० ) नागपंचमीच्या निमित्ताने शेतात पूजा करण्यासाठी गेले होते. दरम्यान वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे घटनास्थळी दिसून आले.
घटनेची माहिती वनविभागाला देताच वनविभागाच्या तळेगाव वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्रधिकारी गजानन लांबाडे, आष्टीच्या वनपरीक्षेत्रधिकारी पूनम ब्राम्हणे, वनपाल रोहिणी पडोळे, वनरक्षक इन्द्रपाल भगत, ठाणेदार राजेश जोशी, पोलिस उपनिरीक्षक हर्षल नगरळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी नोंद केली.